मलकवाडीच्या नंदिनीची एमबीबीएससाठी निवड

October 15, 2026 5:25 PM

Join WhatsApp

Join Now

आदिवासी समाजातील पहिली विद्यार्थिनी; शेतकरी कुटुंबाच्या कष्टांचे चीज

किनवट : जिद्द, मेहनत आणि आई-वडिलांच्या कष्टांना यशाची जोड मिळाल्यास कोणतेही स्वप्न साकार करता येते, याचा प्रत्यय मलकवाडी येथील  नंदिनी विनोद गेडाम हिच्या यशातून आला आहे. शेतकरी कुटुंबातील नंदिनीची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भंडारा येथे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

मालकवाडी गावातून आदिवासी समाजातील विद्यार्थिनीची एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. 

    नंदिनीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोर आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक सुविधा आणि मार्गदर्शनाचा अभाव यांसारखी अनेक आव्हाने असतात. मात्र, या अडचणींवर मात करीत नंदिनीने मिळविलेले यश हे तिच्या जिद्दीचे आणि ध्येयाप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक ठरले आहे. तिच्या यशामुळे गेडाम कुटुंबासह मलकवाडी गावाचा आणि आदिवासी समाजाचा गौरव वाढला आहे.

   नंदिनीच्या यशामागे तिचे वडील विनोद पांडुरंग गेडाम व आई यांचे कष्ट, त्याग आणि प्रोत्साहनाचा मोठा वाटा आहे. शेतकरी कुटुंबातील मुलीने वैद्यकीय शिक्षणासाठी निवड मिळविल्याने आई-वडिलांच्या कष्टांचे चीज झाले आहे.

  नंदिनीने भविष्यात उत्तम डॉक्टर बनून गोरगरीब, शेतकरी आणि गरजू रुग्णांना सेवा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तिच्या या यशाबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती, किनवटचे संचालक बालाजी गोविंद बामने यांनी नंदिनी व तिच्या आई-वडिलांचे अभिनंदन करून पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

नंदिनीच्या या यशामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळणार आहे.

Leave a Comment